Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण


कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण 

गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे "सत्यसुधारक" नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना शेवटी ही गोष्ट महाराजांन पर्यंत गेली त्यावर महाराजांनी एक युक्ती काढली. दररोज शाहु महाराजांची घोडागाडी गंगारामच्या दुकानपुढे थांबु लागली, महाराजांच्या गाडीत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे व महाराज त्यांना घेवून दुकानात यायचे व आपल्या भरदस्त आवाजात चहा मागवायचे, "गंगाराम सर्वांना चहा आण"... स्वतःहा महाराज चहा पिताना दिसल्यावर बाकीच्यांना तो निमूटपणे प्यायला लागे, एवढेच नाहीं तर ज्यांना कुणास सरकारी कागदपत्रावर सही हवी असेल तर सकाळी "सत्यसुधारक" मध्येच येणे असा नियमचा महाराजांनी पाडला. त्यामुळे सकाळी दुकानावर प्रचंड गर्दी व्ह्यायची महाराज गंगारामने केलेला चहा पाजायचे आणि मगच सही करायचे अशी होती राजर्षी शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळ......

जेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात छत्रपती शाहू महाराज चहा पिण्यासाठी जातात...
काय रे तू हॉटेल काढलयसं म्हणं? खरं काय?'राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना विचारलं.'होय महाराज, आपणच सांगितलं काही तरी स्वतंत्र धंदा सुरू कर म्हणून,!' गंगाराम कांबळे यांनी उत्तर दिलं.'मग, पाटी का लावली नाहीस कुणाचं हॉटेल आहे म्हणून?''काय म्हणून पाटी लावायची महाराज? माझी काय कुणावर सक्ती आहे? सगळ्या हाटेलवर काय जातीच्या पाट्या लागल्यात?'असं, व्हय? खरं हाय तुझं. आतापर्यंत किती लोक चहा प्यायले तुझ्या दुकानात?''बरेच लोक प्यायलेत. मला संख्या माहीत नाही.''मग सगळ्या गावालाच बाटवलसं की तू. बरं तर चांगला चहा करून ठेव. जाताना येतो मी.'महाराजांनी आपण चहा प्यायला येणार हे बाहेर गाडीत बसूनच सांगितलं. महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहासाठी येणार ही बातमी म्हणता म्हणता सगळ्या कोल्हापुरात पसरली.महाराज येण्यापूर्वीच अनेक लोक हॉटेलसमोर थांबले. या सगळ्या लोकांसमक्ष महाराज इथं चहा प्यायले. आणि त्यांच्या गाडीतल्या इतर मंडळींनाही चहा पाजला....चहा घेऊन झाल्यानंतर महाराज गंगाराम यांना म्हणाले, "तू सोडावॉटरचं यंत्रही घे. मी घेऊन देईन तुला." महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेलमध्ये सोडावॉटरचं मशिनही घेऊन दिलं.गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातल्या भाऊसिंगजी रोडवर हॉटेल सुरू केलं होत. या घटनेला 100 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. राजर्षी शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातला हा संवाद बरंच काही सांगतो.कृतीतून दिला संदेशशाहू महाराजांनी समाजाला दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला.उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी मुत्सद्देगिरीची, कधी अपरंपार प्रेमाची, कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या वस्तुंना, ठिकाणांना, देवळांना शिवणे हा मोठा गुन्हा समजला जात होता.या स्पृश्यांमध्ये केवळ ब्राह्मणच नव्हे तर मराठे आणि तत्सम अनेक जातींचे लोकही होते. अशा सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत स्वतःच जाहीर कृत्यांनी प्रस्थापित समाजाला हादरे दिले.शाहू महाराज 1920मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला होता.पुढच्याच महिन्यात नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती.शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता.याच दरम्यान कोल्हापुरात घडलेली ही घटना महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा मैलाचा दगड ठरली.पाण्यासाठी गंगाराम यांना मारहाणकोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते.जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ गडबड उडाली.तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम नावाचा एक मराठा शिपाई आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील मोतद्दारास जबरदस्त मारहाण करत होते.कारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं.एका अस्पृश्यानं हौद बाटवला म्हणून संताराम आणि त्याचे साथीदार हातात चाबूक घेवून गंगाराम यांची पाठ फोडून काढत होते. त्यांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला.खरं तरं 1919ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.ते दिल्लीहून येण्याची गंगाराम वाट पाहात होते. महाराज कोल्हापूरला आले. त्यांचा मुक्काम कोल्हापूर शहराबाहेरील सोनतळी इथं होता. महाराज आल्याचं कळताच गंगाराम अस्पृश्य बांधवांसह महाराजांना जाऊन भेटले.महाराजांनी गंगाराम कांबळे यांनी येण्याचं कारण विचारले. गंगाराम कांबळे यांना हुंदका अनावर झाला त्यांनी त्यांची पाठ उघडी करून दाखवली आणि झालेला सर्व प्रकार महाराजांना सांगितला.गंगाराम कांबळेंवर झालेल्या अत्याचाराची कथा ऐकून महाराजांच्या डोळ्यात अंगार फुलत होता. ताबडतोब त्यांनी गंगाराम कांबळेंना ज्यांनी मारलं त्यांना बोलावलं आणि स्वतःच्या हातात घोड्याची कमची घेऊन त्यांच्या पाठी फोडून काढल्या.हे करत असताना हा मराठा आहे, असा विचार त्यांनी केला नाही आणि गंगाराम यांच्या समोर त्यांना शिक्षा दिली.मग त्यांनी गंगाराम यांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. ते म्हणाले, "जा, गंगाराम तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग."अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला....आणि हॉटेल सुरू झालेपुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं.त्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती.ही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही.समाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती.त्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली.महाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत.महाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत.छत्रपती खुद्द गंगाराम यांच्या हॉटेलातला चहा घेत असल्यानं त्यांच्या चहाला नाही म्हणण्याची कोणाची छाती होत नसे.महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहासप्रसिद्ध झाला.महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी दोन मार्ग अवलंबले. एक मार्ग कायद्याचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जाहीर आणि सार्वजनिक कृत्यातून समाजातील अस्पृश्यतेच्या रूढीला सुरुंग लावणे...एक राजा म्हणून पहिला मार्ग तर त्यांनी अवलंबलाच पण गंगाराम कांबळे यांच्या घटनेबद्दल दुसरा मार्ग अवलंबताना त्यांची आईची माया दिसून आली.याच गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या निधनानंतर तीन किंवा चार वर्षांनी शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं होतं.या मंडळानं 1925ला शाहू महाराजांचं पहिलं स्मारक कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारलं. महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण देशातलं शाहू महाराजांचं हे पहिले स्मारक गंगाराम कांबळे यांच्या पुढाकारानं दलित समाजानं उभारलं होतं.

(या लेखाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातील संवादाचा सविस्तर उल्लेख भाई माधवराव बागल यांनी 1950 साली लिहिलेल्या श्री. शाहू महाराज यांच्या आठवणी या पुस्तकात आहे.)

Source :- Facebook

Post a Comment

1 Comments

  1. Prabhakar Wagh26 June 2021 at 10:20

    Asaa Raja punha hone shakya Nahi

    ReplyDelete