जेव्हा दिलीप कुमार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भेटतो
औरंगाबादचं मिलिंद कॉलेज… मराठवाड्यातील आंबेडकरी चळवळीचं माहेरघर. मराठवाडा हा शैक्षणिक दृष्ट्या अतिशय मागास. तिथं शिक्षणाचं बीज रोवलं तर लाखो अस्पृश्य बांधवांचा सहज उत्कर्ष होईल म्हणून पीईएस चं सर्वात मोठं जाळं औरंगाबादेतच बाबासाहेबांनी उभारलं. बाबासाहेब जेव्हा केव्हा औरंगाबाद मध्ये दाखल होत तेव्हा त्यांचा मुक्काम रेल्वे हॉटेल ला ठरलेला असायचा. हे तेच रेल्वे हॉटेल जे कालांतराने हॉटेल अशोका म्हणून ओळखलं जायचं.
मिलिंद कॉलेजच्या स्थापनेपासून त्याच्या उभारणीपर्यंत माई आंबेडकर त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या. बाबासाहेबांना काही हवं नको पाहण्यासाठी माईसाहेबांचे धाकटे बंधू बाळू कबीरही सोबतीला होते. त्या काळात दिलीप कुमार लोकप्रियतेच्या शिखरावर होते. त्यांच्या एकमागोमाग आलेले अनेक चित्रपट भयंकर गाजले होते. बाबासाहेबांच्या मुक्कामाच्या वेळेसच नेमकं दिलीप कुमार सुद्धा औरंगाबादलाच सेम हॉटेल मध्ये मुक्कामाला होते.
बाळू कबीरांकरवी दिलीप कुमार यांना ते राहत असलेल्या हॉटेलमध्ये बाबासाहेब थांबले असल्याचे कळाले. त्यांनीच दिलीपकुमार आणि बाबासाहेबांची भेट घडवून आणली. प्रायमरी इंट्रोडक्शन बाळू कबीरांनीच करून दिलं. बाबासाहेबांनीही आपुलकी दाखवत दिलीप कुमार यांचं स्वागत केलं. त्यांच्या अनेक विषयांवर गप्पा झाल्या. राजकारण ते सिनेमा असं बरंच काही बाही. नंतर विषय आला तो मिलिंद कॉलेजचा. दिलीप कुमार यांनी मिलिंद कॉलेजसाठी भरभक्कम देणगी देण्याचा प्रस्ताव बाबासाहेबांपुढे ठेवला. बाबासाहेब शांतपणे ऐकत होते. आणि त्यांच्या प्रस्तावावर छोटंसं स्मित करून पुन्हा शांत झाले. दिलीप कुमार यांनी पुन्हा देणगीचा प्रस्ताव समोर ठेवला आणि मिलिंद कॉलेजच्या प्रवेशद्वाराला स्वतःचे नाव देण्याची अटही ठेवली.
आता बाबासाहेब मात्र चिडले. त्यांनी दिलीपकुमार खड्या शब्दात सुनावत म्हटले की, सिनेसृष्टीतील लोकांकडे कॅरेक्टर नामक गोष्टच नसते हे पुन्हा खात्रीशीर पटले. बराच संवाद झाला होता तो. प्रचंड झापून दिलीपकुमार आणि त्याने देऊ केलेले पैसे परतवले होते बाबासाहेबांनी. दिलीपकुमार तेथून निघून गेले.
झाल्या प्रकारावर बोलताना बाळू कबीर म्हणाले,
“या नटाकडे लाखो रुपये आहेत. आपण ज्या शिक्षण संस्था चालवतो त्यांना सध्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. आपण त्याच्याशी सलगीने वागला असता आणि त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला हजारो रुपयें दान सहज दिले असते.
“या नटाकडे लाखो रुपये आहेत. आपण ज्या शिक्षण संस्था चालवतो त्यांना सध्या आर्थिक सहाय्याची खूप गरज आहे. आपण त्याच्याशी सलगीने वागला असता आणि त्याला विनंती केली असती तर त्याने आपल्या संस्थेला हजारो रुपयें दान सहज दिले असते.
मेव्हण्याच्या शब्दांनी क्रोधित झालेल्या बाबासाहेबांनी बाळू कबीरांना स्पष्ट सुनावलं की,
“काय म्हणतोस? मूर्ख आहेस तू. ज्या लोकांनी आपल्या शील,चारित्र्याचे प्रदर्शन मांडून धनदौलत कमावली आहे अशा लोकांकडून मी कधीच पैशांची अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही. ज्यांनी अनीतीच्या आणि भ्रष्ट मार्गाने धनदौलत जमवली आहे, त्यांच्या मदतीच्या बळावर ज्ञान दानासारखे पवित्र कार्य मी कधीही करणार नाही. मग माझ्या संस्था मेल्या तरी बेहतर!
थोडक्यात काय तर… पैशाचं दान देणाऱ्याचं इंटेशन महत्त्वाचं असतं.. त्यानं देऊ केलेली रक्कम ही क्षुल्लक असते. सरकारनं 125 कोटी रुपये दिल्यानं सरकार हे अतिशय संविधानवादी आहे असं माननणाऱ्या डीक्कीच्या उद्योजकांनी सदर प्रसंग जरूर वाचावा. आणि त्यातून योग्य तो बोध घ्यावा. आणि जमलंच तर नैतिकतेचा पाठ घालून देणाऱ्या बाबासाहेबांचं आभार ही मानावं. कारण आज मिलिंद कॉलेज कोणत्याही मदतीविना ताठ मानेनं उभं आहे. अन् या महाविद्यालयाने भारताला एकापेक्षा एक महान लोकं दिलीयेत. त्यांच्याबद्दलही लिहीनच सावकाश.. तूर्तास इथंच थांबतो.
सदर घटनेच्या संदर्भासाठी माई आंबेडकर लिखित बाबासाहेबांच्या सहवासात हे पुस्तक चाळता येईल.
0 Comments