Ticker

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग - २

 

रिपब्लिकन पक्षाच्या आजच्या स्वरूपाची आणि त्याच्या भवितव्याची चर्चा करण्यापूर्वी त्याच्या स्थापनेमागील प्रयोजन आणि त्याच्या संस्थापकांचा व्यक्तिमत्वाची माहिती घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय हि चर्चा कल्याणकारी आणि अर्थपूर्ण होऊ शकणार नाही. तसे करणे म्हणजेच रिपब्लिकन पक्षाचा देदीप्यमान वारसा समजून घेणे होय, ज्यांना तो वारसा नीट माहित नसतो त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या खऱ्या स्वरूपाचे आकलन होऊ शकणार नाही. या वारशाचा प्रभाव गेली चाळीस वर्षे इथल्या जनमानसावर कायम असल्यानेच रिपब्लिकन नेत्यांवर दबाव आहे. त्यामुळे रिपब्लिकन नेतृत्व एकीकडून त्यांच्या देदीप्यमान वर्षाच्या प्रभावाने आणि दुसरीकडून जनतेच्या दबावाने स्वतःचा मार्ग चोखाळू शकत नाही. इतिहासाने त्यांच्यावर घातलेली हि सर्वात गंभीर अशी मर्यादा आहे. महापुरुषांच्या छायेत वावरणारी माणसे सुरक्षित निश्चित असतात, परंतु ती स्वतंत्र असतातच असे मात्र नाही. 
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील १९१३ ते १९१६ आणि १९२० ते १९२३ हा कालखंड फार महत्वाचा आहे. या काळाने बाबासाहेबांच्याकडून जे निष्ठूरपणे घेतले आणि त्याच्या मोबदल्यात त्यांना जे उदारपणे दिले त्याचा शोध हि जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे या काळातील ज्या गोष्टीना माझ्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे. त्याची केवळ नोंद या ठिकाणी करण्याचा विचार आहे. कदाचित त्याच्यातून जर एखादे जीवनदृष्टीविषयक सूत्र विकसित झाले तर ते अभ्यासकांना आणि नेतृत्वालाही थोडे फार उपयोगी पडेल त्यामुळे तर आनंद वाटेल. बाबासाहेब साधारणतः साडेपाच वर्षे शिक्षणानिमित्ताने त्याकाळच्या जगातील सर्वात प्रगत देशात वास्तव्यासाठी  होते. अर्थात त्या काळात इतर अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे शिक्षणही युरोप-अमेरिकेतच झालेले होते. मग या दोहोत मूलभूत फरक काय होता ? इतर भारतीय विद्यार्थी परदेशात जाऊन कुठल्यातरी चळवळीत सामील होत होते किंवा पदव्या घेऊन भारतात परतत होते. बाबासाहेबांचे उद्धीष्ट्च वेगळे होते. त्यांच्या नावापुढे जेवढ्या पदव्या आहेत तेवढ्या जगातील क्वचित कुना राजकारणाच्या नावापुढे असतील,हे खरे. परंतु त्यांनी पदव्यांसाठी अभ्यास केला नव्हता तर अभ्यासासाठी ते पाडव्याच्या भानगडीत पडलेले दिसतात. त्यांच्या अभ्यासाचे विषय आणि क्षेत्रे बघितली तरी या सत्याची आपल्याला खात्री होते,एकाद्या विषयाचा अभ्यास करायचे मनात आले कि बाबासाहेब त्यात पदवी घेण्याचा विचार करीत. हि त्या काळातील शिक्षणाची उफराटी पद्धत होती. 
गरीब व मागासलेल्या देशाची तसेच जातिसंस्था आणि अस्पृश्यतेची पाश्वभुमी असणारा बाबासाहेबांसारखा विद्यार्थी पहिल्यांदाच परदेशात गेल्यावर  त्याची मनस्थिती कशी असेल ? बाबासाहेबांनी खार म्हणजे ते सारं लिहून ठेवायला हवं होत. परंतु ते राहून गेले. बाबासाहेब पाश्चिमात्य जगातील माणसे समजून घेत होते. या माणसांनी स्वप्रयत्नानी अर्जित केलेल्या वैभवाचे,प्रतिकूल निसर्ग आणि कर्मठ व्यवस्था यांच्या विरुद्ध त्यांनी केलेल्या संघर्षाचे आणि त्यांनी विकसित केलेल्या वैश्विक संस्कृतीचे बारकाईने निरीक्षण करीत होते. या सर्व गोष्टी त्यांनी ज्या जोरावर केल्या त्या सर्व ज्ञानशाखा पुढे बाबासाहेबांच्या आकर्षणाचा आणि अभ्यासाचा विषय बनल्या. मानवी जीवनातील प्रत्येक ज्ञानशाखेतील जगमान्य व्यक्तींशी बाबासाहेबांनी व्यक्तिगत संबंध प्रस्थापित केला. कधी त्यांच्याशी वाद-विचार केले, कधी त्यांचा रोष पत्करला. यादृष्टीने बाबासाहेबांच्या जीवनातील काही तपशील उदबोधक ठरेल असाच आहे. 
बाबासाहेबांना कोणत्याही क्षुद्र गोष्टींचे कधी आकर्षणच नव्हते. जे अर्थपूर्ण, जे सर्वश्रेष्ठ आणि जे कल्याणकारी त्याचा जणू ध्यासच त्यांच्या मनाने घेतलेला होता. त्यांच्या काळात जगातील एक श्रेष्ठ दर्जाचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून एडविन आरए.सेलिग्मन प्रसिद्ध होते. ते तर त्यांचे शिक्षकच होते. त्यांच्याकडून अर्थशास्त्राच्या ज्ञानाचा कण न कण ग्रहण करण्यासाठी बाबासाहेब त्यांच्या प्रत्येक व्याख्यानमाला कसे अक्षरश: धावत जात होते हे त्यांनी स्वतःच नोंदवून ठेवलेले आहे. सेलिग्मन यांनी बाबासाहेबांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गार प्रसिद्ध आहेत. डॉ. ए.ए. गोल्डनविजर हे मानववंशशास्त्रातील एस असेच प्रसिद्ध नाव. त्यांचे चर्चासत्र त्याकाळात जगप्रसिद्ध आणि त्यात आपला प्रबंध सादर करण्याची  विशेष प्रतिष्ठेची बाब समजली जात होती. बाबासाहेबानी ती प्रतिष्ठा वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्यांच्या चर्चासत्रात प्रबंध वाचून मिळविली.'जातिसंस्थेचा उगम,विकास आणि तंत्र' हा त्यांचा प्रबंधाचा विषय होता. या प्रबंधामुळे मानववंशशास्त्रातील डॉ केतकरांच्यासहित अनेक अभ्यासकांना बाबासाहेबानी चकित करून टाकले. त्या काळात तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात बट्रॉर्ड रसेल हे नाव जगात अग्रगण्य होते. रसेल यांचा दि प्रिन्सिपल्स ऑफ सोशल रिकन्स्ट्रक्शन हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झालेला होता. बाबासाहेबानी इंडियन इकॉनॉमिक सोसायटीच्या जर्नलमध्ये त्याचे १९१८  रसेल अँड दि रिकन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी या नावाने परीक्षण लिहिले होते. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील रसेल यांच्या चाहत्यांचे लक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे आकर्षित झाले, समाजशास्त्राच्या क्षेत्रात सिडने वेब आणि बिट्रियास वेष हे दांपत्य दिगंगड मानल्या जात होते. इंग्लंडला जाण्यापूर्वीच त्यांना भेटण्याचा विचार बाबासाहेबांच्या मनात पक्का होता. म्हणून त्यांनी सेलिग्मनचे पत्र घेतले. सिडने वेब यांच्याशी संपर्क साधला. त्यांची मदत घेतली. त्याच काळात जागतिक क्षितिजावर एक राज्यशात्रज्ञ म्हणून हॅरॉल्ड लास्की उदय पावत होते. त्यांच्या राजकारणाचे व्याकरण, ग्रामर ऑफ पॉलिटिक्स या ग्रंथाला अभ्यासल्याशिवाय आजही राज्यशात्राचे अभ्यासक पुढे जाऊच शकत नाहीत. असा लास्कीच्या समोर लंडन युनिव्हर्सिटीत बाबासाहेबांनी रिस्पॉन्सिबिलिटिए ऑफ जरिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्मेंट इन इंडिया या विषयावर आपले विचार मांडून गदारोळ उडवून दिला. त्यामुळे प्रा. लास्की त्यांच्यावर कोपले. ते म्हणू लागले "आंबेडकरांची विचारसरणी एखाद्या अस्सल राजकीय क्रांतिकारक प्रचाराला शोभणारी आहे." त्यामुळे आंबेडकरांना एक तर हिंदी क्रांतिकारक किंवा 'रशियन क्रांतीचा प्रचारक' म्हणून बराच काळ ओळखले गेले. त्याची बारी-वाईट किंमतही डॉ आंबेडकरांना मोजावी लागली. बाबासाहेबांच्या जीवनातील अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. बाबासाहेब अर्थशास्त्र,राज्यशास्त्र,  समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य आणि विज्ञान या सर्वांचा एखाद्या अधाश्यासारखा अभ्यास का करीत होते? त्याचा त्यांचा व्यक्तिगत जीवनात काय फायदा होता ? या सर्व धडपडीमागे एक सूत्र होते. बाबासाहेबांना मानवी जीवनाचा साम्रज्ञाने अभ्यास करायचा होता. विसाव्या शतकात प्रगतीच्य टोकावर गेलेला माणूस, त्याने बदलेल जुना समाज, त्याने निर्मलेली नवी संस्कृती, त्याने केलेली प्रगती, त्याच्या भविष्यातबद्दल इच्छा आणि आकांक्षा हे सारे त्यांना नम्रपणे, परिश्रमपूर्वक  घ्यावयाचे होते. पण कशासाठी? केवळ अभ्यासासाठी ? कि अन्य कारणासाठी? या प्रश्नांची उत्तरे आहेत-भारतासाठी, भारतातल्या माणसांसाठी, त्यांना सुसंस्कृत आणि समृद्ध बनविण्यासाठी. त्यामुळेच प्रगत पाश्चिमात्य माणसाशी, त्याच्या आधुनिक समाजव्यवस्थेशी, त्याच्या लोकशाही शासनाशी आणि त्याच्या समृद्ध संस्कृतीशी भारतासारख्या दरिद्री, कर्मठ आणि धार्मिक मनोवृक्तीच्या माणसांची नाळ कशी जोळायची याचा ध्यासच जणू बाबासाहेबानी घेतला होता. त्यांचे सारे पुढील आयुष्य हे या ध्यासाला वास्तवात आणण्यासाठी केलेल्या महत्वप्रयत्नांचा तपशील आहे. त्यामुळेच त्यांना संस्कृतीरक्षक वैरी मानत होते आणि शोषणाचे समर्थक शत्रू. बाबासाहेबांनी या कशाचीच तमा बाळगली नाही. त्यांनी विवेकाच्या साहाय्याने आणि संघटित शक्तीच्या जोरावर इथल्या विषम आणि असंस्कृत वास्तवावर प्रहार केले. त्यांच्या ज्ञानाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल असूया बाळगणारे अनेक जण त्याही काळात होते, आजही आहेत. 

त्यामुळे कोणत्याही प्रश्नाकडे बघण्याची, त्याची चिकित्सा करण्याची आंबेडकरांच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण दिसते. त्यांनी १९१९ साली साऊथबरो कमिशनला सादर केलेल्या अहवालापासून ते १९५५ साली भाषावार प्रांतरचनेच्या संबंधी व्यक्त केलेल्या मतापर्यँत व्यवहारिक, तांत्रिक गोष्टीसंबंधी आणि राष्ट्राच्या मूलभूत प्रश्नांसंबंधी जी मते बांधलेली आहेत, त्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक असा तीन पाटल्या आहेत. त्यामुळे बाबासाहेबांबरोबर  वादविवाद करणे सोपे नव्हते. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करणे आणि त्यांचा ज्ञानक्षेत्रातील दरारा मान्य करून स्वतःची सुटका करून घेणे मात्र सोपे होते. त्यामुळेच आंबेडकर नावाचा एक दरारा जीवनाच्या अनेक क्षेत्रांत निर्माण झाला तो आजपर्यंत तरी आपण टाकलेला पाहतो. त्याला जसे समर्थक लाभले तसे विरोधकही लाभले. 

बाबासाहेबानी स्वप्रयत्नाने अर्जित केलेली हि विद्वत्त, कर्तृत्व आणि कीर्ती हा सर्व्यांच्याच आदराचा विषय होता. परंतु बाबासाहेब हे नाव हे भारतातील सर्व उपेक्षित जनसमुदायासाठी मात्र एक संरक्षक कवच होते. हे नावच त्यांना जीवनात स्वाभिमानाने उभे राहायला आणि भविष्याची स्वप्ने रंगविण्यासाठी कृपाछत्र वाटत होते. हेच संरक्षक कवच आणि कृपाछत्र बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाच्या हातात दिले आणि ते निघून गेले अशीच या समुदायाची आजही भावना आहे. म्हणूनच त्यांच्या दृष्टीने बाबासाहेब आणि रिपब्लिकन पक्ष यांचे अस्तित्व अभिन्न आहे. त्यांनी मनातल्या मनात त्यांच्यात कधीच अभेद्य निर्माण केलेला होता. रिपब्लिकन पक्ष दीर्घकाळ व्यवहाराचा, राजकीय चिकित्सेचा विषय त्यामुळेच बनू शकला नाही. उपेक्षित जनमानसातील आंदालनांनी त्याला भावनेच्याच पातळीवर ठेवले. हि त्या पक्षाची एक वास्तविक मर्यादा आहे. परंतु, दलित समाजातून अनेक नेते उदय पावले आणि राजकीय दृष्टया गेले, अनेक संस्था आणि संघटना उदय पावल्या आणि अस्तंगत झाल्या, अनेक गट-तट निर्माण झाले; तरीही समाजमनात मात्र बाबासाहेब आणि रिपब्लिकन पक्ष यांच्यात अभेद्य मानलेली प्रतिमा कधी सुप्त तर कधी प्रकट रूपात अढळ राहिली. हे रिपब्लिकन पक्षाचे अनन्यसाधारण असे सामर्थ्य आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चिवट अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. हे रहस्य केवळ उत्पादनशक्ती- फोर्सेस ऑफ प्रॉडक्शन आणि उत्पादनसबंध- रिलेशन्स ऑफ प्रॉडक्शन यांची चर्चा करून उलगडवून दाखविता येणे अवघड आहे.  त्यासाठी समाजाच्या भौतिक पायाबरोबरच भारतीय हिंदूंच्या सांस्कृतिक परंपरेच्या आणि जातिसंस्थेच्या उगम,विकास आणि प्रभावाच्या गतिशास्त्राचा विचार होणे आवश्यक आहे. धर्मशास्त्रांनी जनमानसावर दीर्घकाळ टाकलेल्या प्रभावाचीही चिकित्सा होणे गरजेचे आहे. थोडक्यात असे म्हणता येईल कि, धर्मचिकित्सा होणे आवश्यक आहे. तिच्या अभावामुळे भारतात वर्गीय चळवळ उभीच करता आली नाही. जिला वर्गीय चळवळ मानले गेले, तिच्यात जातीय जाणीव तशाच प्रबळ राहिल्या. राजकीय लोकशाहीने त्यांना अधिक गती दिली आणि बदलत्या राजकीय वास्तव्यात संधी मिळताच त्यांच्यात स्फोट होऊन त्या फुटल्या. डाव्या आणि पुरोगामी चळवळींनी परिश्रमपूर्वक निर्माण केलेली वर्गीय एकजूट या प्रकारे विघटित होणे आणि कामगार चळवळीत या प्रकारचे धरणीकंप होणे हि तापदायक घटना आहे. तिने सर्वच कष्टकऱ्यांची मुक्ती लांबणीवर टाकली आहे. रिपब्लिकन जनता यांच्यापैकी एक असल्याने या घटनेच्या दुष्पपरिणामापासून ती अलिप्त राहू शकत आहे.

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग - १

रिपब्लिकन पक्षाचा खरा इतिहास भाग - 

पुढील भाग लवकरच प्रकाशित करण्यात येईल. 

संदर्भ- रिपब्लिकन पक्ष ऐक्य,वास्तव आणि भवितव्य 
लेखक- डॉ रावसाहेब कसबे 

- रिपब्लिकन चळवळ टीम 

Post a Comment

0 Comments