माणुस जेव्हा जन्माला येतो, तेव्हा माणुस फक्त माणुसच असतो. नंतर तो त्याच्या संबंधीत धर्माचा होतो आणि त्यासाठीच प्रत्येक धर्माने आपली स्वत:ची अशी धार्मिक विधी निर्माण केली आहे. क्रिश्चन धर्मिय त्याला बाप्टिसम म्हणतात, मुस्लिम धर्मात त्याला खतना म्हणतात. एवढेच नव्हे, तर ब्राम्हण समाजात सुद्धा कोणी ब्राह्मण कुटुंबांत जन्माला आला म्हणुन ब्राह्मण होत नाही, तर जेव्हा ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या व्यक्तीची मुंज (उपनयन) केली जाते. तेव्हाच त्या व्यक्तीला ब्राम्हण म्हणुन मान्यता प्राप्त होते.
बौद्ध धम्मात सुद्धा अशाच प्रकारची विशिष्ट अशी विधी आहे. ज्याला 'श्रामणेर दिक्षा' असे म्हणतात. प्रत्येक बौद्ध व्यक्तीने जीवनातील एक दिवस तरी चिवर (बौद्ध धम्मगुरु परिधान करीत असलेले वस्त्र) धारण करणे गरजेचे आहे. भारतामध्ये श्रामणेर दिक्षा बाबत कमी जागरुकता आहे. जे लोक धम्म चळवळीत काम करतात किंवा ज्या लोकांना धम्माची जास्त ओढ आहे, तेच लोक श्रामणेर दिक्षा घेतात, इतर बौद्ध लोक श्रामणेर दिक्षा घेत नाहीत. पण जपान, चीन, श्रीलंका, थायलंड, कंबोडीया, म्यानमार आदी बौद्ध बहुसंख्येने असलेल्या देशात श्रामणेर दिक्षा बंधनकारक आहे. थायलंड देशात जिथे राजेशाही पद्धत आहे. तिथल्या राजाने जर त्याने श्रामणेेर दिक्षा घेतली नाही, तर त्याला राजा म्हणुन मान्यता प्राप्त होत नाही. तसेच भारतातील सिक्किम, अरुणाचल प्रदेश, काश्मिरातील लेह, लडाख या भागातील बौद्ध लहानपणीच श्रामणेर दिक्षा घेतात, अनेकवेळा आपण टिव्हीवर बालवयातील श्रामणेर पाहीले असतीलच.त्यामुळे भारतातील प्रत्येक बौद्ध व्यक्तीने श्रामणेर दिक्षा घेणे गरजेचे आहे. त्यासाठी भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, त्रैलोक्य बौद्ध महासंघ या आणि इतर सर्व बौद्ध धार्मिक संस्थांनी त्यांच्या सभासदांसाठी श्रामणेर दिक्षा बंधनकारक करावी. तसे परिपत्रकच सर्व धार्मिक संस्थांनी काढावे. बौद्ध लोकांना भलेही इतर कधिही ते बौद्ध आहेत कि नाही, याचे भान नसते. त्यांना धम्म, समाज आठवत नाही. पण घरात जेव्हा लग्न, नामकरणविधी किंवा दुख:द घटना घडते, तेव्हा बौद्ध असल्याची आठवण होते. अशा वेळी ते जेव्हा धम्म संस्थेंकडे जातात, तेव्हा धम्म संस्था अशा लोकांना सर्वप्रथम सभासद होण्यास सांगतात. त्यानंतरच त्यांना सहकार्य करण्यात येते. त्याचप्रकारे ज्या व्यक्ती श्रामणेेर दिक्षा घेतलेले असतील, त्याच व्यक्तींना सर्व बौद्ध धार्मिक संस्थांनी सभासदत्व देण्याचा नियम करावा. तसेच जे लोक नव्याने बौद्ध धम्मात धर्मांतर करतात, त्यांना सुद्धा धर्मांतर करतेवेळीच श्रामणेेर दिक्षा देण्यात यावी. श्रामणेर दिक्षा घेतल्यानंतरच धर्मांतर विधी पुर्ण झाली, असे समजण्यात यावे.
यासाठी लहानपणीच वयाच्या दहाव्या वर्षी मुलगा, मुलगी दोघांनाही श्रामणेर दिक्षा देण्यात यावी. मुलींचे मुंडन नाही केले तरी चालेल, त्यांना केवळ चिवर धारण करण्यास द्यावे. दहाव्या वर्षी यासाठी की, तोपर्यंत मुलांना समज आलेली असते. तसेच त्यांच्यावर ज्या विधी करण्यात येतील, त्याबाबत त्यांना देखील जाणीव, माहिती असणे गरजेचे आहे. कारण एकदमच लहान मुलांना दिक्षा दिली आणि जर त्यांना काही कळतच नसेल, तर त्या विधीला महत्व नाही. तसेच तारुण्यात, प्रौढावस्थेत श्रामणेर दिक्षेसाठी मुंडन करावे लागत असल्यामुळे दिक्षा घेण्यास सहसा कोणी तयार होत नाही. तसेच श्रामणेर दिक्षा ही काही नव्याने निर्माण करण्यात आलेली विधी नसुन, पुर्वापार चालत आलेली विधी आहे. तसेच यामध्ये कोणालाही कोणत्याच प्रकारचा आक्षेप असण्याचे कारण नाही. तसेच श्रामणेर दिक्षेमुळे बालवयात असतानाच आपल्या भावी पिढीला धम्माची ओढ निर्माण होईल.
संकलन - बुद्ध धम्म फेसबुक पेज.
0 Comments